पुणे

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या डीपीआरची सादरीकरण बैठक संपन्न चाकणच्या तळेगाव चौकात ग्रेड सेपरेटर बांधा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात असते, त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौकात ग्रेड सेपरेटर बांधण्याची सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या डीपीआरच्या सादरीकरणाची बैठक आज पुण्यात पार पडली. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी ही सूचना केली.

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याचा डीपीआर तयार करताना भविष्यात चाकणपर्यंत निओ मेट्रो आणली जाणार आहे. त्यामुळे या एलिव्हेटेड रस्त्याचा डीपीआर तयार करताना निओ मेट्रोसाठी तरतूद असावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे आणि तंत्रज्ञ टीम तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची तांत्रिक टीम यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या या दोन्ही महत्त्वाच्या यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्वाची होती.

आज झालेल्या बैठकीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड रस्त्याच्या सर्वच पैलूंवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली शिरुर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील एलिव्हेटेड बाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे शिरूर महामार्गावरील एलिव्हेटेड रस्ता वाघोलीपासून सुरू न करता तो चंदननगरपासूनच सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच आज जरी मेट्रो वाघोलीपर्यंत नियोजित असली तरी वाघोलीच्या पुढे निओ मेट्रोचा विचार करुन नियोजन करावी अशी सूचना केली. त्यामुळे पूर्णपणे एलिव्हेटेड रस्ता न करता चंदननगर ते शिक्रापूर दरम्यान दुमजली आणि शिक्रापूर ते रांजणगाव दरम्यान एकमजली आणि शिरूरपर्यत सहापदरीकरण करण्यात यावी असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सुचविले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून भविष्यातील गरज विचारात घेऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लान डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्याची गरज लक्षात होती. त्यामुळे चाकणच्या सध्याच्या दोन पुलांप्रमाणे नंतर नियोजन चुकलं असं सांगण्यापेक्षा आधीच चुका टाळण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून आजची बैठक होती. त्यामुळे मी रस्ता मंजूर केला असा अभिनिवेश आणण्यापेक्षा त्याचा सर्वांगिण विचार करुन प्रत्येक स्तरावर त्यात बारकाईने लक्ष घालून महामार्गांची आखणी व्हावी असा माझा प्रयत्न आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.