पुणे

“लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी, पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडे खोरांच्या आवळल्या मुसक्या,

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणीकाळभोर : कुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन लोखंडी पालघन, दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २३) मध्यरात्री म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजजवळ करण्यात आली. प्रेम राजु लोंढे (वय १९ रा. रेल्वे गेट जवळ, आळंदी रोड, मुळ रा. जामखेड, अहमदनगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय २६ रा. पानमळा राड, मुळ रा. बाबळगाव, जि. बीड), गणेश भगवान खलसे (वय-२२ रा. माळवाडी कुंजीरवाडी, ता. हवेली), तानाजी भाऊसाहेब गावडे (वय-२३ रा. माळवाडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २३) रात्री फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आडके व भगत यांना माहिती मिळाली की, ७ ते ८ जण म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजच्या जवळ थांबले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून पळून जात असताना चार आरोपींना पकडण्यात आले. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता कुंजीरवाडी येथील ॲटोकॉर्नर एच. पी. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. आरोपींकडून २ लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण,पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, बाजीराव वीर, भगत, आडके, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.