पुणे

कवी विनोद अष्टुळ यांचा पालिकेतर्फे सन्मान

पुणे महानगर पालिका मराठी भाषा संवर्धन समिती मार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे आयोजित केला जातो. विनोद अष्टुळ हे मराठी भाषेची सेवा गेली अनेक वर्षे साहित्य सम्राट संस्थेच्या उपक्रमाद्वारे करीत आहेत. त्यांना पु.ल.देशपांडे उद्यान, सिंहगड रोड पुणे येथे चार दिवसाच्या भव्य पुस्तक प्रदर्शनामध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मंचावर ह.भ.प. सुभाष बदधे महाराज १६१ व्या कविसंमेलनाचे अध्यक्ष, डॉ.पांडुरंग बाणखेले प्रमुख पाहुणे, शिक्षण मंडळ माध्यमिक विभागाच्या देशपांडे मॅडम, अलका जोशी, संजय मुळूक आणि श्याम भुरके उपस्थित होते.

माणूस विचाराशिवाय शोभत नाही.त्याच्या जीवनाचे काव्य झाले पाहिजे. हे कविसंमेलनाने घडत असते. काव्य शास्त्र विनोद म्हणतच आपल्याला या विनोदने आतापर्यंत १६१ वेळा एकत्र आणले आहे. असे अध्यक्षीय भाषणात बडधे महाराज बोलत होते. पुढे अलका जोशी म्हणाल्या की नदीचा प्रवाह जसा तिच्या दोन्ही तिरावरच्या अनेक घटकांना समृद्ध करीत हसतमुख वाहतो तसे सर्वांना सामावून घेत अष्टुळ यांचे नित्यकर्म सुरू आहे.

यावेळी कवीसंमेलनात विजय सातपुते, अशोक भांबुरे, शिवाजी उराडे, बंडा जोशी, श्रीकांत वाघ, प्रल्हाद शिंदे, के.मोगल, दत्तात्रय खंडाळे, जनार्दन भोसले, बाबा ठाकूर, नकुसा लोखंडे, विनोद ताम्हाणे, बबन धुमाळ, लक्ष्मण शिंदे, अशोक शिंदे, नानाभाऊ माळी, चंद्रकांत जोगदंड, उमाकांत आदमाने, सुनील हनवते, सीताराम नरके, सूर्यकांत नामुगडे आणि देवेंद्र गावंडे यांनी आपल्या बहारदार रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी आणि विनोद अष्टुळ यांनी तर आभार किशोर टिळेकर यांनी व्यक्त केले.