पुणे

हडपसर इतिहासाच्या पाऊलखुणा… हडपसरचे ग्रामदैवत – ऐतिहासिक भैरवनाथ-जोगेश्वरी मंदिर

 

हडपसरचे ग्रामदैवत भैरवनाथ आणि जोगेश्वरी मंदिर हे ईतिहास कालीन असल्याचे काही पुरावे मंदिराच्या जिर्णोद्धार करताना आढळून आले आहेत. उत्खनन करताना पाच-सहा फुट खोलीवर काळ्या-तांबड्या रंगाच्या मातीचे खापरांचे अवशेष मिळाले होते तसेच काही हाडे, दगड आणि शाळीग्राम मिळाले होते असे संदीप तुळशीराम तुपे उर्फ भाऊ यांनी सांगितले.

त्यावर नक्षीकाम सुध्दा दिसून आले होते असेही ते म्हणाले. या मंदिराची पहाणी प्रसिद्ध पुरातत्वज्ञ व डेक्कन कॉलेजचे कुलपती असलेले डॉ. गो.ब.देगलूरकर तसेच अभ्यासक डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. गुरुदास शेटे येथे सापडलेल्या अवशेषांची पहाणी केली होती. येथे शिवपूर्व काळातही वस्ती असावी असल्याचा दुजोरा जाणकार देतात.

हडपसरचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी या मंदिराचा जिर्णोध्दाराची सुरुवात संदीप तुपे यांनी 2004 साली केली. संदीप तुपे, गणेश टेमगिरे आणि जगदीश लांजेकर लिखित “हडपसरचा ऐतिहासिक परिचय” या पुस्तकात इसवी सन 1778 ते अगदी अलीकडील म्हणजे इ.स.1958 या काळातील नोंदी असल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रंथ आणि कागदपत्रातून यात्रा व उत्सवासंबंधी नोंदी आढळत असल्याचे म्हंटले आहे.

जिर्णोध्दार नंतर दैनंदिन पोषाख, आरती, नैवेद्य ही सुरू करण्यात आले. वर्षातून प्रत्येक शुक्ल पक्षात अष्टमीला भंडारा असतो. यावेळी सुमारे एक हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात.
तीथीनुसार भैरवनाथ जयंती व धर्मनाथ बीज साजरी करण्यात येते यावेळी होमहवन, महाप्रसाद केल्या जातो.

परिसरातील अभ्यासकांनी गर्भगृह, सभामंडप आणि दीपमाळ असल्याचे सांगितले ते आजही दिसून येतात. या मंदिराची रचना उत्तरेस प्रवेशद्वार व नगरखाना, हेमाडपंथी रचना, मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी संरक्षक भिंत दिसून येते.

या ग्रामदैवताचा उत्सव डिसेंबर महिन्यात मोठ्या उत्साहात आजही साजरा केल्या जातो. प्रसंगी विविध भव्य पालखी सोहळा, मिरवणूक काढली जाते. उत्सवप्रसंगी छोटीमोठी दुकाने येथील गांधी चौकात उभारलेले असतात. या उत्सवात पूर्वी कुस्तीचे आखाडे, तमाशाचा फड आदींचा समावेश होता. दसर्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघनाच्या निमित्ताने ढोल, बँड पथकासह पालखीची मिरवणूक आजही पारंपरिक पद्धतीने निघते. यावेळी ग्रामस्थ, सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी सहभागी होतात. बंटर हायस्कूलच्या मोकळ्या मैदानात सत्कार समारंभ, शमीच्या रोपांची पुजा करून सोने लुटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

मुळ मंदीर 18 फुट उंच होते त्यावर साधारण 36 फुट उंचीचे शिखर बांधन्यात आले आहे. 42″ उंचीचा सुवर्ण मुलाम्याचा कळस गोविंद गिरी किशोरजी व्यास यांच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले. येथील मंदिराच्या परिसरातील पाणी व्यवस्था साठी असलेला आडाचे पुनरुज्जीवन करण्यात आले असल्याची माहिती संदीप तुपे यांनी दिली. मंदीरातील देवदेवतांची पुजाअर्चा रवींद्र बबन ठोसर व ठोसर कुटुंबियांच्या वतीने आलटून पालटून केल्या जाते.

सुधीर मेथेकर,
मो.न.9730065485