पुणे

दोन दशकानंतर होणारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रथी महारथींमुळे होणार चुरशीची, महारथींची प्रतिष्ठा पणाला…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

तब्बल दोन दशकानंतर होणारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रथी महारथी मैदानात उतरल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात चुरचीशी होणार असे चित्र निर्माण झाले आहे, त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार असल्याने अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी ही निवडणूक तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असून ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे, बाजार समितीच्या निवडणुकीची मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून यात १८ जागांसाठी १७ हजार ४१९ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत, एक मार्च पर्यंत या यादीवर हरकती नोंदविता येऊ शकतील, या आक्षेपांवर १ ते १० मार्च या कालावधीत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यानंतर १५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल असे सांगण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या बैठका या ठिकाणी सुरू झाल्या असून यामधून पक्षीय गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे, या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होऊ शकते परंतु या मध्ये नात्यागोत्यांचा मोठा फरक या मतदानावर होत असताना अनेक वेळा पहावयास मिळाला आहे.

या बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १८ पैकी ११ उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मधून निवडले जाणार आहेत, यासाठी १३४ सोसायटीचे १ हजार ६५५ सदस्य असून चार उमेदवार हे ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत, यासाठी हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य आहेत, दोन व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी १३ हजार १७३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असे चित्र प्रथमदर्शी निर्माण झाले आहे.