Uncategorized

पुणे : वानवडी येथे होत असलेला बालविवाह रोखण्यात बालविवाह समितीला यश…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे येथील वानवडी भागात गुरुवार (ता. २३) रोजी सकाळी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती बालन्याय मंडळाच्या माजी सदस्या मनिषा पगडे यांनी दुरध्वनी द्वारे बाल कल्याण समिती पुणे भाग एकच्या अध्यक्ष व सदस्य यांना दिली असल्याची माहिती बाल कल्याणचे सदस्य आनंद शिंदे यांनी दिली, दरम्यान लग्न होत असलेल्या बालिकेचा जन्म दाखला समिती सदस्यांना प्राप्त झाला असून त्यावर बालिका अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

बाल कल्याण समिती च्या अध्यक्षा डॉ राणी खेडीकर, सदस्य आनंद शिंदे, ऍड. पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड व शामलता राव यांनी वानवडी पोलिस स्टेशन ला त्वरित संपर्क करून सदर बाबतीत माहिती दिली असता वानवडी पोलिस स्टेशन ने त्वरित अल्पवईन बालिकेस ताब्यात घेतले, व व्हिडिओ कॉल व्दारे अध्यक्षा व सदस्य यांनी बालिका, तिची आजी आणि काका यांच्याशी संवाद साधला, बालीकेची आई ती एक वर्षाची असतानाच वारली असून, तिच्या वडिलांना फिट्स येतात, बालिकेची आजी भिक्षा मागून बालिकेचा सांभाळ करत असल्याची माहिती मिळाली.

बालिकेचा विवाह दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी ठरवण्यात आला होता अशी माहिती देखील प्राप्त झाली आहे , अशा परिस्थितीत बालिका ही काळजी व संरक्षण अंतर्गत येत असल्या कारणाने बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ राणी खेडीकर, सदस्य आनंद शिंदे, वैशाली गायकवाड, श्यामलाता राव, पूर्वी जाधव यांनी चर्चा करून बालिकेला एका संस्थेत सुरक्षित दाखल केले, बालिकेचे पुनर्वसन हेतू ठोस निर्णय समिती कडून घेतले जातील.

मनीषा पगडे, बाल कल्याण समिती पुणे भाग एक आणि वानवडी पोलिस स्टेशन यांच्या तत्परतेने हा बाल विवाह थांबवण्यात यश मिळाले, भविष्यात बालविवाह रोखण्यासाठी व माहितीसाठी बालकल्याण समितीशी संपर्क करा असे आवाहन बाल कल्याण समितीचे सदस्य आनंद शिंदे यांनी केले, दिनांक ३ जून २०१३ व दिनांक १८ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार ग्रामसेवक व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांना अंगणवाडी शिक्षिका सहाय्य करतात, याशिवाय पोलीस, ग्रामसेवक, ग्रामसेविका, शिक्षक व समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची बालविवाह रोखण्याची जबाबदारी आहे.

अठरा वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत फक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असे वानवडी पोलिसांनी सांगितले.