पुणे

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला कोथरुडमधील सोसायट्यांच्या समस्यांचा आढावा

जलदगतीने उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

पुणे, दि. २४: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षेखाली कोथरूड परिसरातील समस्यांबाबत बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. या भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न, पार्किंग आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश  पाटील यांनी दिले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माईर्स एमआयटी संस्था समूहाच्या सह महासचिव डॉ. अदिती कराड, सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

सिग्मा वन सोसायटी सोसायटीला पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने अतिरिक्त गरज भागवण्यासाठी विकत टँकर घ्यावे लागत असल्याने सोसायटीला महानगरपालिकेकडून दररोज किमान एक टँकर पाणी देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

सदर सोसायटी पाणीपुरवठा योजनेत टेल एंडला असल्यामुळे पाणीपुरवठा दाबाच्या सध्या समस्या आहेत. मात्र सध्या शहरात काम सुरू असलेल्या नवीन २४ बाय ७ योजनेत या परिसरातील बहुतांश भाग गांधीभवन जलकुंभावर शिफ्ट होणार असून सिग्मा वन सोसायटी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेवर राहणार असल्याने भार कमी होऊन योग्य दाबाने पाणी मिळेल. हे काम साधारणतः ५ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्य अभियंता पावसकर यांनी दिली. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री  पाटील यांनी दिले.

एमआयटी मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थीसंख्या असून अतिरिक्त वाहने संस्थेच्या आवाराबाहेर रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर यावेळी चर्चा करण्यात आली. संस्थेच्या आवारात नवीन बहुमजली पार्किंग उभारणी सुरू आहे. त्यामुळे बाहेर रस्त्यावर वाहने लागणे बंद होईल असे याविषयी एमआयटी संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

एमआयटीने आपले पार्किंगचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, एमआयटी संस्थेने त्यांच्या संस्थेचे विकेंद्रीकरण करावे जेणेकरुन एकाच ठिकाणी विद्यार्थीसंख्या वाढणार नाही. महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, सिगारेट आदी पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी पोलीस विभागाने दैनंदिन गस्‍त घालावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

यशश्री कॉलनीतील रहिवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने ग्रीनझोन कमी करण्याच्या अनुषंगाने विकास आराखड्यामध्ये सुधारणेबाबत प्रस्ताव तयार करावा, असे यावेळी पालकमंत्री पाटील यांनी निर्देश दिले.