पुणे

“धक्कादायक :- ऐकावे ते नवलच – शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाईक व केटर्स चालकात तुफान हाणामारी”

हडपसर, (पुणे) : लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाईक व केटर्स चालकात तुफान हाणामारी झाल्याची घटना शेवाळेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजयोग मंगल कार्यालयात रविवारी (ता. २३) घडली आहे.

याप्रकरणी व्यवस्थापक दिपांशु गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हडपसर पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब ग्रील हॉटेल येथे गुप्ता हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचे मालक कमलदिपसिंग यांनी शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालय चालविण्यास घेतले आहे. रविवारी तेथे लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह होता. हा हॉल संजय लोखंडे यांनी बूक केला होता. जेवणाच्या व्यवस्थेचे काम फिर्यादी गुप्ता यांच्याकडे होते.

दिड वाजता लग्न पार पाडल्यावर सर्व पाहुण्यांचे जेवण झाले. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडील एक व्यक्‍ती किचनमध्ये आली, तेव्हा त्याने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी काही हरकत नसल्याचे सांगितल्यावर त्याने सोबत आणखी दोन माणसे आणली. ते राहिलेले सर्व जेवण डब्यांमध्ये भरत होते.

त्यातील एकजण गुलाबजाम डब्यात भरू लागला, त्याला गुप्ता यांनी गुलाबजाम उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत ते तुमचे नाहीत, ते घेऊ नका असे सांगितले.
दरम्यान, याचा राग येऊन तीघांनी गुप्ता याला हाताने मारहाण केली तर त्यातील एकाने लोखंडी झारा गुप्ता याच्या डोक्‍यात मारून जखमी केले. यानंतर गुप्ता यांचे मालक आल्यावर आरोपी तेथून पळून गेले.