पुणे

“हनीट्रॅप म्हणजे काय रे ? का अडकतात मोठे अधिकारी या वासनेच्या जाळ्यात?

हनीट्रॅप म्हणजे काय रे भाऊ ?

सध्या वर्तमानपत्र उघडले की हनीट्रॅप मध्ये अडकलेल्या शास्त्रज्ञाची बातमी वाचून देशातील सर्वांना फार मोठा धक्का बसला आहे. संदर्भातील बऱ्याचशा बातम्या वाचायला मिळतात. परंतु नेमका अर्थ पटकन कळत नाही ! ज्यावेळी संपूर्ण बातमी वाचतो त्यावेळी लक्षात येते की आपल्या कडून काही तरी काढून घेण्यासाठी रचलेला एक प्लॅन. ज्यामध्ये एखादी सुंदर तरुणी, स्त्री जी आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या व्यक्तीला हवं असेल त्या प्रमाणे वश करून पाहिजे ते साध्य करते.

डीआरडीओच्या संशोधन व विकास संस्थेचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे हनीट्राप मध्ये आडकले असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यांच्याकडून संदेशाची देवाण-घेवाण झाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे फोटो पाकिस्तानला शेअर केले असल्याचे समोर येत आहे हे वाचून देशातील जनतेला मोठा धक्का बसला आहे त्या संदर्भात काही ठिकाणी याचा निषेध करण्यात आला आहे.

तस पाहिले तर हे काही नवीन नाही. सर्वश्रेष्ठ विश्वामित्राची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मेनकेला पाचारण केले होते. इंद्रदेवाला अशी भीती होती की, जर विश्वामित्र तपश्चर्येत यशस्वी झाले तर ते स्वतः सर्व सृष्टीचे देवता होतील ! यामुळेच असे कारस्थान रचले गेले होते. खरं तर याचे समर्थन आम्ही अजिबात करत नाही. परंतु असंच काहीसं आता घडत आहे असे वाटतयं.

असाच पुरातन काळापासून प्रचलित असलेला भाग आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठमोठ्या हस्तींना जाळ्यात पकडून गोपनीय माहिती काढण्यासाठी उपयोगात आणला जात आहे असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही !

ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर हेरगिरी करून एखाद्या गोपनीय क्षेत्रातील माहिती काढून घेण्यासाठी उच्च पदस्थ अधिकार्यांना, वैज्ञानिकांना, सैन्यातील संबंधित अधिकार्यांना अशा हनीट्रॅप पध्दतीने अडकवून त्यांच्या कडून गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी या क्लुप्त्या अधूनमधून वापरल्या जातात. अशा गोष्टी देशाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकतात हे माहिती असूनही या दुष्टचक्रात आपलीं तज्ञ मंडळी मोहाला बळी पडून अडकतात ही गोष्ट देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरते.

म्हणून म्हणावे वाटते की देशहितापेक्षा कोणीही मोठे नाही. कुठल्याही आमिशांना बळी पडून देशाच्या संरक्षण सिध्दतेला कोणी बळी पडत असतील तर त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला हवीच.

सुधीर मेथेकर,
पुणे