दिल्ली

“सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, वर्धापनदिनी दिल्लीत शरद पवारांची मोठी घोषणा;

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, मात्र काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारीचं वाटप करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याशिवाय, या नेत्यांसह पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांचं नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत”, असं शरद पवारांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जाहीर केलं.

प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी

सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी

सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या

डॉ. योगानंद शास्त्री- दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

के. के. शर्मा – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग

फैजल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळ

नरेंद्र वानवा – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग

जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग

नसीम सिद्दिकी – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा

 

“मला विश्वास आहे की ही पूर्ण टीम सर्व सहकाऱ्यांना उत्साह देतील, लोकांमधला विश्वास वाढवतील आणि देशातल्या परिवर्तनात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निभावण्यासाठी आपली कामगिरी चोखपणे बजावतील”, असं शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी नमूद केलं.