पुणे

“हडपसरच्या पुरातन इतिहासाची साक्षीदार – हडपसरची वेस…

मराठी मध्ये वेस म्हणजे गांवकुसाचा दरवाजा, नगरद्वार. पूर्वी गावांच्या वेशीला खूप महत्त्व होतं. गावची दिव्यता वेशीवरुन ठरली जायची. अनेक गावात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असायचा तो म्हणजे वेस.

आता शहरालगतच्या ग्रामीण भागाचे शहरीकरण झाले आहे, त्यामुळे आता गावची वेस जवळपास आपल्याला दिसत नाही. खरंतर गावची वेस एक वैभव होते.

बैलगाडीतून वेस दिसायला लागली की समजायचं गांव आलं आहे. मुख्य रस्त्यापासून कोस-दोन कोस किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंतरावरुन गावाची वेस दिसायची अन् गावाकडे आल्याचा आनंद द्विगुणित व्हायचा.

 

गावातील या वेशीला एक इतिहास नक्कीच होता/आहे. गावातील सणवार, उत्सव असलाकी मिरवणूक नक्कीच वेशी पर्यंत जायची. त्या वेशीच्या आसपास हनुमान मंदिर निश्चितच ! हनुमंताचे दर्शन घेऊन पारावर गावकरी जमून एकमेकांच्या अडीअडचणी, सुखदुःखाच्या गोष्टी करायचे. आता फार कमी ठिकाणी हे चित्र पहायला मिळते ! काही ठिकाणी भव्य दिव्य किल्ल्यावर सुध्दा वेस दिसून येत.

अशा या वेसीचा थोडक्यात इतिहास सांगायचे कारण आता पूर्वीच्या हडपसरची एकच ओळख शिल्लक आहे ती म्हणजे हडपसर गावची वेस. आजही दिमाखात उभी आहे. पूर्वी हडपसरच्या वेशीवर नगारखाना असायचा असे जुणे जाणकार मंडळी सांगतात.

 

वेशीच्या डावीकडे आणि उजवीकडे असे दोन्ही बाजूला दोन मोठमोठे बुरुज, आतील बाजूस कोनाडे आहेत. वरच्या भागात नगरखाना आहे. नगरखान्यात कित्येक वर्षे वाचनालय चालू होती. मी त्या वाचनालयात जात असे. वेशीतून आत प्रवेश करताच डावीकडे हनुमान अर्थात मारुती मंदिर आहे(पूर्वी हे मंदिर कौलारू होते) तर समोरच्या बाजूला राम मंदिर आहे.

दरवर्षी भाद्रपदी पोळा साजरा केल्या जातो बँड, ढोलताशांच्या गजरात सजलेल्या बैलांची मिरवणूक वेशीतूनच जाते ती मारुतीच्या दर्शनासाठी. त्यामुळे हडपसरचे वैभव म्हणजे आजही तग धरून असलेली “वेस”च आहे.

अति उत्साही मंडळी या वेशीवर आपल्या जाहिराती टांगून हडपसरचे वैभव झाकून टाकतात याची मात्र खंत वाटते !

सुधीर मेथेकर