Uncategorizedपुणे

हडपसरचे नाव परदेशात गाजविणारा…आयर्नमॅन डॉक्टर – शंतनू जगदाळे

“पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने” या गाण्यातील ओळीने मला जीद्द दिली त्यामुळे सर्व क्षेत्रात यशस्वी झालो आहे हे वाक्य आहेत आयर्नमॅन डॉक्टर – शंतनू जगदाळे यांचे. यात यश संपादन कसं केले ते सांगताना डॉक्टर म्हणाले, सकाळी उठायचे पटापट आवरायचं आणि आपला दवाखान्यात जावून रुग्णसेवा करायची असं साचेबद्ध जीवन जगण्याची सवय कुठल्याही डॉक्टरच्या अंगवळणी पडलेली असते हे आपल्याला माहिती असते. काही  डॉक्टर राजकारण/समाजकारण क्षेत्रात तर काही डॉक्टर संगीत, नाट्य क्षेत्रात आढळून येतात हे सर्वश्रुत आहे. परंतु एखादा डॉक्टर राजकारण/समाजकारण या बरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातही सहभागी झाल्याची उदाहरणे फार कमी असतील !

हडपसर येथील डॉ. शंतनू जगदाळे हे असंच एक व्यक्तीमत्व आहे जे डॉक्टरी पेशा बरोबरच राजकीय/सामाजिक कार्यक्षेत्रात जसं सहभागी आहे तसेच ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयर्न मॅन, कॉम्रेड मॅरेथॉन आदी स्पर्धेत सहभागी होऊन नावलौकीक कमवायचे ध्येय सुध्दा पूर्ण केले आहे.

या स्पर्धे संबंधात बोलताना ते म्हणाले गेली या स्पर्धांसाठी मी तयारी केली ती हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद व माझा दवाखाना सांभाळून ! ही प्रेरणा मिळाली ती डॉ. योगेश सातव यांच्या “रनोहोलीक्स” या फिटनेस ग्रुप मधून. ग्रामीण भागातून आल्यामुळे पोहणे, पळणे आदी गोष्टी येत होत्याच. परंतु या स्पर्धेच्या अनुषंगाने शास्त्रोक्त पद्धतीने मी या बाबी शिकून घेतल्या.

रोज सुमारे 5.30 ते 9 वाजेपर्यंत धावण्याचा सराव केल्याने  5,10,25,21 कि.मी.धावणे आजही सहजपणे शक्य होते आहे. तसेच दर रविवारी 6-7 तास सायकलिंग, रनिंगसाठी वेळ देत आलो. शास्त्रोक्त पोहण्यासाठी घोरपडी पेठेतील निळू फुले स्विमिंग पूल, पानसेत धरणाच्या बॅकवॉटर आणि कासारसाई-विर धरण येथे सराव केला.

या तयारी मुळे 21 कि.मी.हाफ मॅरेथॉन, 42 कि.मी.ची फूल मॅरेथॉन, गोवा येथील हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथील बर्गमन स्पर्धा पूर्ण केल्या यामुळे आत्मविश्वास वाढत गेला त्यातून आतंरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यायचं स्वप्न बाळगले ते पूर्ण केले आहे.

कजाकिस्तान येथील आयर्नमॅन या स्पर्धेत सहभागी होउन ती 14 तासात पूर्ण केली. त्याच प्रमाणे जगातील सर्वात खडतर व कठीण स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन जी पिटर्सबर्ग ते दर्बान 90कि.मी.स्पर्धा यशस्वीपणे पार केली हि अभिमानाचीच नव्हे तर गौरवाची गोष्ट आहे. आपल्या डॉक्टरी पेशाला व रुग्णांनाच्या सेवेत कुठेही बाधा येऊ दिली नाही त्याच प्रमाणे राजकारण व समाजकारण करणारा यशस्वी डॉक्टर म्हणून डॉ. शंतनू जगदाळे यांच्याकडे पाहिल्या जाते. कदाचित हे सर्व कळणारा एकमेव राजकीय पुढारी – डॉक्टर असावा !

ऑल द बेस्ट डॉक्टर कीप इट अप !!

सुधीर मेथेकर