पुणे

व्यसन मुक्ती अभियानांतर्गत पथनाट्याचे हडपसर मध्ये आयोजन -पोलिस स्टेशन आणि विधी महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम

व्यसनाधिनतेमुळे होणारी जीवहानी दिवसेंदिवस वाढते आहे. व्यसनामुळे होणाऱ्या आजारांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाची बरीच मोठी यंत्रणा आणि पैसा खर्ची पडतो. त्यामुळे शासनातर्फे व्यसनमुक्तीसाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. यात मुख्यत्वे जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे. याच अनुषंगाने हडपसर पोलिस स्टेशन आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर यांच्या संयुक्त सहकार्याने व्यसन मुक्ती अभियानांतर्गत पथनाट्याचे आयोजन हडपसर मध्ये विविध ठिकाणी केले होते..

आजची तरुण पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने स्वतच्या शरीराची हानी तर होतेच त्याचबरोबर कौटुंबिक स्वस्थाही बिघडले जात आहे. त्यामुळे व्यसनापासून दूर रहा आणि आनंदी आयुष्य जगा असा संदेश विधी महाविद्यालय, हडपसरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यतून दिला आहे.

यावेळी बोलताना विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील म्हणाल्या कि, अंमली पदार्थांचे सेवन करण्यामध्ये युवकांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून त्यामुळे त्याचे दुष्परीणाम समाजात वाढले आहेत. हे दुष्परीणाम कमी करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. नवीन पिढीला त्यांच्यापासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्या मध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना हडपसर पोलिस स्टेशन चे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलिस निरीक्षक रविन्द्र शेळके म्हणाले की,आजच्या युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता हा देशा समोर सर्वात मोठा चिंतेचा विषय असुन व्यसनमुक्त समाज व नशा मुक्त भारत करण्यासाठी सर्व स्तरातून संघटीत प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

 

पथनाट्य सादरीकरणा मध्ये आशिष घाडगे, कपिल पाटील, शिवेंद्र पाटील, सुप्रिया देशपांडे रणशूर, क्षितिजा भंडारे, ऋतुजा गोसावी, सानिया शेख, शुभांगी अरणे, रंजित पाडवी, चिन्मय खोटे, हेमंत शिवले, कनिफ सातव, ताराक्षु वडेर इत्यादी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हडपसर पोलिस चौकीचे अधिकारी दिनेश शिंदे, उमेश शेलार आदींनी परिश्रम घेतले.