पुणेमहाराष्ट्र

धक्कादायक : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार स्कूलची विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली;सुदैवाने जीवितहानी नाही…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलच्या बसला मोठा अपघात झाला आहे. बस ड्रायव्हर चे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस झाडावर आदळली. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. सदरील घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्हीचे फुटेज देखील समोर आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. सोमवारी 4 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र वाटेतच ही बस ड्रायवरच्या हलगर्जीमुळे झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले.

अचानक घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यी मोठमोठ्याने रडू लागले. मात्र उपस्थित नागरिकांनी त्यांना धीर देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानी कुणालाही गंभीर इजा झाली नाही.
बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.