पुणे – आजवर आणीबाणी विषयी ऐकलं होतं, पण आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली अशी संतप्त प्रतिक्रिया देत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आता कांदा उत्पादक व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला.
कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ उठवावी आणि अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने ग्रासलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या विषयावर आज गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी चर्चेची मागणी करत होतो. मात्र कोणतीही चर्चा न करता आम्हा दोघांचही थेट निलंबन करण्यात आलं, असं सांगून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सरकारला फक्त ‘मन की बात’ करायची आहे, पण ‘जन की बात’ ऐकायची नाही हे दुर्दैव आहे.
अवकाळी पाऊसामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर इतकं मोठं संकट आलं असताना त्यावर कोणतीही चर्चा न करता निलंबनाची कारवाई सरकारनं केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
 
                                                    
 
                             
                                 
                                