प्रतिनिधि -स्वप्नील कदम
लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेली भागातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व मारामाऱ्या करून दहशत पसरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या ऋषिकेश पवार व त्याच्या इतर 3 साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख १) ऋषिकेश सुरेश पवार (वय २६, रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, कदमवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), २)गौरव चंद्रकांत सोनवणे (वय २१, रा. घोरपडे वस्ती, लेन नं. ११, लोणी काळभोर, ता. हवेली), ३)सागर गणपत पवार (वय २६, रा. फ्लॅट नं. ५०१, समृध्दी बिल्डिंग, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिकेत गुलाब यादव (वय २१, रा. पठारे वस्ती लोणी काळभोर) हा आरोपी अजून पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला नाही.
टोळीचा म्होरक्या हृषिकेश पवार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने लोणी काळभोर व परिसरामध्ये दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील ८ ते १०वर्षात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मृत्यू तसेच जबर दुखापत करणे, व बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून वेळ पडल्यास हत्यारे काढून दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवून गुन्हेगारी कृत्य सातत्याने सुरू ठेवली होती. ऋषिकेश पवार टोळीवर यापूर्वी ही जरब बसवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, ह्या कारवाईचा ह्या टोळीवर व त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही फरक पडला नाही.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ चे आर. राजा यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
सदर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, अमोल घोडके, सर्वेलन्स अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.