पुणे

“शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हाती घड्याळ – अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, “शिरूर मतदार संघातून महायुतीतून आढळराव पाटील उमेदवार..

संयुक्त शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (२६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटीलदेखील उपस्थित होते. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांची उमेदवारी अजित पवार यांनी जाहीर केली.

माजी खासादर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात होतं.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आढळराव यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. परंतु, अजित पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील आणि आढळराव यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार शिवाजीरावांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांची उमेदवारी अजित पवार यांनी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याव्यतिरिक्त सर्व खासदार शरद पवारांबरोबर थांबले. शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटात जाण्यास नकार दिला. त्यामुळे अजित पवार गटाला या मतदारसंघात एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याने शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वांशी समन्वय राखून काम करणार….
शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या पक्षातील सर्व नेत्यांबरोबर समन्वय राखला जाईल, पंधरा वर्षाच्या खासदारकीच्या काळात अनेक प्रकल्प राबविले, माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार व या मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊन येथील प्रश्न सोडविणार.
शिवाजीराव आढळराव पाटील
माजी खासदार