पुणे

“आजोबांनी पुन्हा डॉ. अमोल कोल्हेंना आकराशे रुपये दिले…! “निवडून तर तुम्हीच येणार आजोबांचा डॉ. कोल्हे यांना आशीर्वाद…

शिरूर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा शिरुर तालुक्यात गावभेट दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यात एका आजोबांनी डॉ. कोल्हे यांना कोपरीच्या खिशातून आकराशे रुपये काढून दिले आणि सांगितलं पुन्हा ताकदीने निवडणूक लढा तुमचा विजय ठरलेला आहे.

शिरुर तालुक्यातील हिवरे कुंभार गावच्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी डॉ. कोल्हे गेले असता हाडाचे शेतकरी असलेले श्री. किसन गणपत तांबे हे डॉ. कोल्हे यांच्या शेजारी जाऊन उभे राहिले आणि हातात माईक घेऊन आजोबांनी विचारलं खासदार साहेब तुम्हाला पहिली निवडणूक झालेली आठवते ना, तुम्हाला निवडणूक लढविण्यासाठी आकराशे रुपये दिले होते, अन् आजही आकराशे रुपये देणार आहे. मी कोणाचे पैसे घेत नाही तुम्हाला देण्यासाठी वेगळे पैसे ठेवले आहेत, आणि तुम्ही १००% निवडून येणार आहे, हा माझा शब्द आहे. असं म्हणत आजोबांनी आकराशे रुपये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केले.

त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांना आजोबांनी आठवणही करून दिली की, तुम्ही माझ्या सुनेचे भाऊ आहात कारण माझी सून देखील तुमच्या नारायणगावचीच आहे. त्यांनतर डॉ. कोल्हे यांनी आजोबांचे चरण स्पर्श करत आशिर्वाद घेतले. यावर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद तुमचे माझ्या पाठीशी आहे म्हणूनच मी संसदेत तुमचा आवाज बनून प्रश्न मांडतो.दरम्यान २०१९ च्या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांना मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लोकांनी खिशातील पैसे देऊन निवडणूक लढविण्यासाठी मदत केली होती तर यावेळी देखील गेल्या निवडणुकी प्रमाणे हिवरे गावचे शेतकरी किसन तांबे यांनी पुन्हा आकराशे रुपये कोपरीच्या खिशातून काढून दिले आणि आशिर्वाद देत पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास दिला.