पुणे

वरुणराजाला खुश करण्यासाठी लोणी काळभोर येथे “वन भोजन”

प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर – लोणी काळभोर, कदम वाकवस्ती परिसरात भरपूर पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने वनभोजनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.  वनभोजन करण्याची प्रथा येथे गेल्या अनेक वर्षापासून आहे. 

           यावर्षी वरूणराजानेे थोडीशी कृपादृृष्टी केली असली तरी प्रतिवर्षाची परंंपरा अबाधित ठेवून वनभोजना साठी येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची पालखी विठ्ठल मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात येणार आहे. जाताना पालखी अंबरनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे जाईल. या सोहळ्यात लोणी काळभोर व कदमवाक वस्ती गावातील आबालवृद्ध सहभागी होतात. गुलालाची उधळण करत, विविध संतांचे अभंग गात सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा येथे हा पालखी सोहळा पोहोचतो. तेथील राममंदिरात आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन डोंगरावरील गोवर्धन पर्वताची पुजा करण्यात येते. त्यानंतर तीर्थक्षेत्र रामदरा येथील महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने उपस्थितांना भात, आमटी, शिरा, जिलेबी, लाडूचा महाप्रसाद देण्यात येतो. याबरोबरच आलेले भाविक आपापल्या घरुन पुरण पोळी घेऊन येतात. यावेळी एकमेकांना आग्रह करून पुरणपोळी खायला दिली जाते. 
            भोजन झाल्यावर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात अंबरनाथाची दोन्ही मंदिरे, महादेव, विठ्ठल व मारुतीच्या मंदिरात आरती होते. त्यानंतर पालखी परत ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या जुन्या मंदिरात आणली जाते. तेथे आरती होऊन वनभोजनाची समाप्ती होते. या दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून कोरडा दिवस पाळावा तसेच वनभोजनाच्या कार्यक्रमात सर्व गावक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन योगेश काळभोर व हभप विनोद महाराज काळभोर यांनी केले आहे.