पुणे

इंग्रजांना घालवले, तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल… हडपसरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

पुणे : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. विरोधात बोलणाऱ्यांना खोट्या केस टाकून तुरुंगात टाकले जाते. देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, असा सवाल करत त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केली होती. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजित कदम, अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जयदेव गायकवाड, माजी आमदार महादेव बाबर, बंडू गायकवाड, योगेश ससाणे, विजय देशमुख, हेमलता मगर, पुजा कोद्रे, प्रवीण तुपे, प्रशांत सुरसे, दिलीप तुपे, समीर तुपे, संजय शिंदे, अजय सकपाळ, शीतल शिंदे, पल्लवी सुरसे, वंदना मोडक, सविता मोरे उपस्थित होते.

 

पवार म्हणाले की, दहा वर्षांत काय केले हे सांगण्यापेक्षा मोदी व्यक्तीगत हल्ले करत आहेत. असत्यावर आधारित बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात उल्लेख नाही, अशा गोष्टी मांडतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील, असे सांगतात. सांगण्यासारखे काही नसल्याने असत्य प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांची टिंगलटवाळी करतात. गांधी कुटुंबाने देशासाठी योगदान दिले असून, त्याच्या एक टक्का तरी मोदी यांनी योगदान दिले का, याचे उत्तर द्यावे. देशात गांधी-नेहरु यांचा विचार मजबूत केला पाहिजे, असे विधान मी केले. त्यावर आमच्या पक्षात या म्हणत आहेत. ज्या पक्षात व्यक्तीगत स्वातंत्र्य नाही, देशाच्या ऐक्याच्या विचार नाही. विचारधारेत समाजातील सर्व घटकांना आत्मविश्वास देण्याचा कार्यक्रम नाही.

धर्मवादी विचाराचा पुरस्कार केला जातो, अशा पक्षाच्या आसपाससुद्धा मी, उद्धव ठाकरे आयुष्यात कधी उभे राहणार नाही. या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते केले जाईल. आतापर्यंत देशातील निवडणुका एक, दोन ते जास्तीत-जास्त तीन दिवसात झाल्या. यंदा पहिल्यांदा सात टप्प्यांत निवडणूक होत असून निवडणूक विभागाचा निर्णय संशय निर्माण करणारा आहे. ४० खासदार असलेल्या तामिळनाडूतील निवडणूक एका टप्प्यात आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांची निवडणूक सहा टप्प्यांत, हे कशासाठी, याचा अर्थ काय, लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका आहे. त्याला पुष्टी देण्याचे काम या निर्णयामुळे होत असल्याचेही ते म्हणाले.