पुणे

“हडपसर भागातून पालखीची जोरदार तयारी, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची अतिक्रमण कारवाई

हडपसर : परिसरातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून भाजी मंडई ते गाडीतळ परिसरातील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे पंचावन्न अनधिकृत व अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलिस अशा १६२ जणांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाई दरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या भागात अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमण पदपथासह मुख्य रस्त्यावरही पसरत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून थेट रस्त्यावरून चालावे लागते. तर रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत वारंवार महापालिका व पोलिसांकडे तक्रार करावी
लागत असल्याचे प्रवासी व स्थानिक नागरिक सांगतात.
सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई ते गाडीतळ परिसरातील अनधिकृत शेड, दुकाने, पान टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, लोखंडी स्टॉल, खाटा, पथारी व टेबलवर धडक कारवाई केली. तेथील साहित्य जप्त करण्यात आले. महापालिका क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक धनंजय नेवसे, संजय जाधव, सचिन उतळे, सुभाष जगताप, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड, राहुल बोकन, किरण शिंदे, दीपाली भालचिम, सूरज जारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ९५ बिगारी सेवक, ७ पोलिस कर्मचारी, ६० महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

 

परवानाधारक व्यावसायिकांनी अटीशर्तीचा भंग करू नये. त्यांनी थकीत भाडे लवकरात लवकर भरावे. असे न केल्यास परवाने रद्द केले जातील. ग्राहकांनीही अनधिकृत व अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांकडून माल खरेदी करू नये. असे आवाहन महापालिका क्षेत्रीय निरीक्षक सुभाष तळेकर यांनी केले आहे.

 

हडपसर अतिक्रमण कारवाईत सातत्य का नाही….
हडपसर मध्ये दैनंदिन अतिक्रमण होत असते परवानाधारक पथरी व्यवसायिकांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करतात त्यामुळे रस्ता अरुंद होऊन सततचे वाहतूक कोंडी होते पर्यायाने अपघात होतात महानगरपालिका अधिकारी व अतिक्रमण कर्मचारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतात का असा सवाल नागरिक करत आहेत.