पुणेमहाराष्ट्र

रोबोने खरंच आत्महत्या केली का ?

नुकतंच वर्तमान पत्र वाचत असताना लक्ष वेधून घेतले ते एका आश्चर्यकारक बातमीने, ती बातमी म्हणजे अमेरिकी बनावटीच्या(बेअर रोबोटिक्स) रोबोने अर्थात यंत्रमानवाने कामाच्या अति तणावामुळे आत्महत्या केली ! ही बातमी वाचून आश्चर्यचकित झालो नाही तर नवलच म्हणावं लागेल नाही का ? मानव/यंत्रमानव बनविणारे तंत्रवैज्ञानिक यंत्रमानवात मन, भावभावनांचा शिरकाव करू शकले का ? असतील तर ते देवदूतच म्हणावे लागतील !

खरंतर वैज्ञानिकांनी लोकांच्या सेवेसाठी हा यंत्रमानव बनविला आहे. कारण अति ताणतणावामुळे मनुष्याच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होऊन तो टोकाची भुमिका घेऊ नये म्हणून यंत्रमानव बनविला. परंतु या बातमीमुळे मात्र खळबळ उडाली आहे ! कारण जर तो अति ताणतणावामुळे आत्महत्या करु शकत असेल तर, उद्या त्याच्या मनात समोरील व्यक्ती बद्दल राग निर्माण झाला तर तो काहीही करु शकेल !

आपल्या मानवी विचारांपेक्षा तो जास्त विचार करू लागला तर ! कसं होईल काय होईल असेच विचार आपल्याला पडले तर नवल वाटायला नको. मानवाच्या विकासासाठी शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले जसे टिव्ही, मोबाईल व त्यासाठी इंटरनेट, यंत्रमानव, विविध आधुनिक यंत्र, अवजारे जे मानवाचे श्रम करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे आहेत. परंतु त्यांचा वापर अतिप्रमाणात केला तर तो घातकच ठरत आहे ! याचाही अनुभव आपण घेत आहोत.

खरंच जर शास्त्रज्ञांनी मानवी यंत्रात “मन”, भावभावनांचा शिरकाव करून दिला तर…. ! भविष्यात ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु यामुळे शास्त्रज्ञ शोध लावून मोकळे झाले अन् इतर समाज मात्र आळशी झाला आहे, त्यांने आपले बौध्दिक विकासासाठी प्रयत्न करणं सोडून दिले तर नाही ना ? असंच काहीसं झालं आहे ! कारण पूर्वी चार-पाच कोस चालणारी मंडळी गाडी शिवाय पुढे सरकत नाही ! अगोदर सर्वांचे फोन नंबर पाठ असायचे, आता स्वतःचा मोबाईल नंबर सुध्दा पाठ नसतो(काही अपवाद सोडले तर!) तर दुसऱ्याचा नंबर पाठ असणं अवघडच !

असो , जगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होईल, परंतु त्यांचा वापर मात्र आवश्यक आहे तेवढाच केलेला बरा नाही का ?

सुधीर मेथेकर,
पुणे