पुण्यात अतिवृष्टीमुळे धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अजब कारभारामुळे हडपसर परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी टंचाईमुळे गेले अनेक महिने नागरिक त्रस्त आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पासून धरणातील पाणी साठा कमी असल्या कारणाने पाणी कपात सुरू झाली असून सध्या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असूनही सोसायट्यांमध्येपुरेसे पाणी मिळत नाही.
हडपसर गाडीतळ येथील प्रियदर्शन सोसायटीमधील नागरिक अनेक दिवसांपासून पाणी टंचाईने ग्रस्त आहेत. अनेक वेळा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी पाठपुरावा करूनही सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. सोसायटीच्या सभासदांनी तातडीची सभा बोलवून महानगरपालिका पाणीपुरवठा विभागासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रियदर्शन सोसायटीचे चेअरमन विजय भाडळे यांनी सांगितले की वारंवार पाणीपुरवठा विभागाशी संपर्क, पाठपुरावा करूनही पाणी सोडले जात नाही. पुरेसे पाणी नसल्याने, महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधी लक्ष घालायला तयार नाही.
सोसायटीत अनेक दिवस पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी येण्याच्या वेळा निश्चित नसल्याने नोकरदार वर्गाची रोजच पाण्यासाठी तारांबळ होत आहे. असे उपाध्यक्ष साधू बनकर यांनी सांगितले.