कोंढवा -पुणे हे शिक्षणाचे माहेरघर नव्हे तर इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत येत आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे.
अशातच आता पुन्हा एकदा पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलीसांनी छापेमारी केली आहे. या कारवाईत हुक्का पार्लर हे माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाचं असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यात पोलीसांची मोठी कारवाई
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे येथील कोंढवा परिसरात असलेल्या ‘द व्हिलेज’ या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलीसांच्या पथकास मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील हे त्यांच्या पथकासह हॉटेलवर गेले, त्यावेळी रात्री त्यांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलीसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.याप्रकरणात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाकेर रमेश बागवे, हरुन नबी शेख, अमानत अन्वर मंडल, अमानत अन्वर, बिक्रम साधन शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी ‘इतका’ मुद्देमाल केला जप्त …
पोलीसांच्या चौकशी दरम्यान संबंधित हुक्का पार्लर हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रमेश बागवे यांच्या मुलासह ५ जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश बागवे या माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरवला जात होता. याप्रकरणी त्यांच्यावर पोलीसांनी थेट कारवाई केली आहे.
या छापेमारीत पोलीसांना २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ मिळाले आहेत. तसेच हुक्क्याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉट देखील पोलीसांनी जप्त केले आहेत.