पुणे

नृत्य-नाटय सादरीकरणातून भारतीय संस्कृती संवर्धनाचा संदेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात ; माजी विद्यार्थ्यांनी उलगडला यशस्वीतेचा प्रवास

पुणे : श्री गणेश, भगवान शंकर, देवी पार्वती यांसह विविध देवदेवतांच्या लिला… भारताच्या कानाकोप-यातील विविध भाषांवर आधारित नृत्य आणि स्वसंरक्षणार्थ आवश्यक असलेल्या कौशल्यांचे सादरीकरण करीत नृत्य-नाटयाच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरुन दाद मिळाली. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. टिळक स्मारक मंदिर आयोजित कार्यक्रमाला क्रन्सा डायग्नोस्टिक सेंटरचे प्रधान संचालक माणिक मुथा, फ्युएल बिझनेस स्कूलचे केतन देशपांडे, मयुरी देशपांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, माऊली रासने, राजाभाऊ पायमोडे, विजय भालेराव, विजय चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी योजनेतील क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात विशेष सन्मान करण्यात आला.

योजनेतील माजी विद्यार्थी ओंकार बारबोले म्हणाला, ट्रस्टच्या शैक्षणिक समुपदेशन आणि संस्कार वर्गातून आम्हाला नैतिक मूल्ये मिळाली. त्यामुळे आम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होत आहोत. आत्मविश्वासवृद्धी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याच योजनेत आम्हाला झाली असून समाजात आज ताठ मानेने वाटचाल करीत आहोत, असेही त्याने सांगितले.

योजनेतील माजी विद्यार्थीनी निकिता व्यवहारे हिने ट्रस्टमार्फत चालणारे एमबीए, बीबीए सारखे उच्च शिक्षण फ्युएल बिझनेस स्कूलच्या माध्यमातून मोफत घेतलेले आहे. प्रसंगी अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करून ती आज मल्टी नॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे. तिला त्यापूर्वी आलेल्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये देखील ट्रस्टने हातभार लावल्याने आज यशस्वीरित्या कार्यरत असल्याचे तिने सांगितले.

केतन देशपांडे म्हणाले, मानवी संसाधन म्हणून भारताकडे आज पाहिले जात आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगली मुले घडू शकतात. आज प्रत्येकामध्ये संभाषण कौशल्य असणे गरजेचे आहे. तसेच पालक व मुलांमध्ये योग्य संवाद देखील आवश्यक आहे. ट्रस्टचे काम अत्यंत उत्तमपणे सुरु असून याकरिता आम्ही १५ लाख रुपयांची देत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महेश सूर्यवंशी म्हणाले, जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत सन २०१० साली जय गणेश पालकत्व योजना सुरु झाली. मराठी शाळांमधून ५०० पेक्षा जास्त गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची शैक्षणिक जबाबदारी ट्रस्टने घेतली आहे. आजमितीस योजनेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत असून हे योजनेचे यश आहे. तहसीलदार, पीएसआय पदांसह पीएचडीधारक, इंजिनियर, एमएससी, बीएससी, एमए, बीकॉम आणि बीए असे शिक्षण पूर्ण करीत यशस्वी झाले आहेत.

फ्युएल बिझनेस स्कूलच्या माध्यमातून अनेक कोर्सेस विनामूल्य दिले जात आहेत. तर, क्रन्सा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून रक्तासह विविध १६ प्रकारच्या तपासणी विनामूल्य करून दिल्या जात आहेत. त्यामुळे योजनेतील विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचे सहाय्य उपलब्ध करण्यास सहकार्य होत आहे, असेही त्यांनी सांगितले. अक्षय गोडसे यांनी आभार मानले.