पुणे : डॉक्टर हा व्यक्तीच्या अंतरंगात डोकावत असतो. अगदी जन्म होण्यापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंत विविध व्यक्तीरेखा त्याच्या आयुष्यात येत असतात. रुग्णाकडे तो रोगाच्या पलिकडे जाऊन पाहत असतो. त्याचे रुग्णाच्या कुटुंबियांशीही नाते जोडले जाते. या भावसंबंधातून डॉक्टरच्या मनात कथाबीज फुलावे अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन आय. एम. ए.चे महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाच्या निमित्ताने आज (दि. 30) सरहद स्कूल, कात्रज येथे डॉक्टरांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भोंडवे बोलत होते. अध्यक्षस्थानी आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ. राजन संचेती होते. डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. सतीश देसाई, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. अमोल देवळेकर, डॉ. पद्माकर पंडित, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मिलिंद भोई, डॉ. मिलिंद टोणपे, डॉ. मनिष निकम, डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, उमेश चव्हाण, सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, मनिषा वाडेकर, अनुज नहार, झाहिद भट, मुख्याध्यापिका निर्मला नलावडे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय व्यवसायाबरोबर साहित्य निर्मिती क्षेत्रातील अनुभव व्यक्त करतानाच सहभागी डॉक्टरांनी कथा, काव्य, कादंबरी लेखन तसेच वाचन याविषयी उपस्थितांना अवगत केले.
डॉ. भोंडवे म्हणाले, डॉक्टर लेखकांनी मान्यताप्राप्त साहित्यिकांमध्ये आपण कुठे आहोत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टर उत्तम पद्धतीने कथाबीज फुलवू शकतो; परंतु दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी लिहित्या डॉक्टरांना विविध साहित्य संस्थांमार्फत मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मधुसुदन झंवर म्हणाले, एका खेळाडू नेत्रतज्ज्ञाला समाजप्रबोधनाच्या कार्यातून लेखक म्हणून घडविले आहे.
डॉक्टर जसे समाजासाठी चांगले कार्य करतात तसेच ते उत्तम साहित्यिक आणि साहित्यप्रेमीदेखील असतात, असे सांगून डॉ. सतीश देसाई म्हणाले, प्रत्येक डॉक्टरच्या मनात एक हळवा कोपरा असतो त्यातून त्याच्या मनामध्ये एखादा विषय रुजतो आणि त्यातून साहित्य फुलविले जाते.
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर म्हणाले, सृष्टीत सर्वत्र विज्ञान आहे. प्रत्येक शोधामागे मानवी भावभावनांचा कल्लोळ असतो, एक कथा असते. त्यातील सुरस, मनोरंजक कथा मानवी मूल्ये, संवेदना आणि सहवेदना जपण्यासाठी माझ्या हातून लिखाण झाले. डॉ. मिलिंद भोई म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे, सरस्वतीची पूजा आहे. सरस्वतीचे पूजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते.
डॉ. रणजीत घाटगे यांनी ‘मेहरू’ ही कथा प्रभावीपणे सादर केली. तर डॉ. दाक्षायणी पंडित यांनी ‘कथा’ नावाची कविता सादर केली. डॉ. मनिष निकम यांनी डॉ. अमरसिंह निकम यांच्यावर केलेली कविता सादर केली तसेच आजच्या तंत्रज्ञानाचे घातक दुष्परिणाम ओळखून आजच्या युगाने पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळावे, असे आग्रही मत प्रदर्शित केले.
‘बॉलिवुड खजाना’ या आपल्या पुस्तकनिर्मिती विषयी डॉ. मिलिंद टोणपे यांनी अनुभव कथन केले. तर डॉ. अमोल देवळेकर, डॉ. सुनील जगताप, रुग्णहक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. राजन संचेती यांनी सरहदच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याविषयी कौतुक करून संमेलनाचा आढावा घेतला.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, साहित्य संमेलन हे इव्हेंट नसून ही सांस्कृतिक परंपरा आहे. अनेक डॉक्टर हे उत्तम साहित्यिक असतात, चांगले विचार समाजापुढे मांडतात. दिल्लीत होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने डॉक्टरांचे साहित्य संमेलन घेऊन त्यांच्यातील साहित्यिक मूल्ये समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.
मान्यवरांचे स्वागत संजय नहार, शैलेश वाडेकर, अभय नहार, मनिषा वाडेकर, निर्मला नलावडे, रंजना देशमुख आदींनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. गणेश निंबाळकर यांनी गणेशवंदना सादर केली. सूत्रसंचालन डॉ. निरज जाधव यांनी केले.