प्रतिनिधी – स्वप्नील कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर येथिल शीतला देवी नगर (गारुडी वस्ती) येथे राहणाऱ्या इंडियन ऑईल टर्मिनल या कंपनी मधे काम करणाऱ्या कामगाराने”मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, यांनी आख्ख मला वाटला लावलं, या चार पाच जणांनी.” अशी आत्महत्येपूर्वी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या पाठीमागील वस्तीत बुधवारी (ता. ६) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी काळभोर (कदम वाक् वस्ती) येथील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय-३८, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. तर सुनिल विजय कसबे (वय ३२), सारिका उर्फ सावित्रा सुनिल कसबे (वय २७), सुनिता विजय कसबे (वय ४७) करण कालु कसबे (वय २२, सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे), अक्षय केवट (वय ३०) व अजित सिंग (वय ३०, दिघेही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुकाराम भाले यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले हे लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीमध्ये काम करीत होते. तेव्हा आरोपी अक्षय केवट हा फिर्यादी यांना म्हणाला “तु मला आवडते, मला तुझ्यासोबत रिलेशन मध्ये राहायचे आहे, तुझ्या नवऱ्याला देखील काही कळणार नाहीं” असे म्हणुन फिर्यादी यांची छेडछाड करून अश्लील बोलायचा तसेच कोणीही नसताना फिर्यादी यांच्यासोबत लगट करून विनयभंग करत असे.
फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले यांनी या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांना तक्रार केल्याने सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी फिर्यादी यांना कामावरुन काढुन टाकले. त्यानंतर फिर्यादी यांचे पती तुकाराम भाले यांना सुध्दा कामावरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला. या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तुकाराम भाले यांनी राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
दरम्यान, तुकाराम भाले यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी व स्वतःचा विनयभंग केल्याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ७४, ७९, ३५२, ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करीत आहेत.
तुकाराम भाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. “करण कसबे, सुनिता कसबे, सारिका कसबे, अजित सिंग यांच्यामुळे मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, यांनी आख्ख मला वाटला लावलं, या चार पाच जणांनी.” असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.