१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातील जनतेला लुबाडणाऱ्या, शेजारील गुजरात व गोवा राज्यांपेक्षा तिप्पट जास्त किमतीने नंबर प्लेटची विक्री करुन गुजराती कंपन्यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या राज्य व केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे. कारण एचएसआरपी नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ज्या खासगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्या HSRP नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळालेआहे.
पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. उदा. गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकीसाठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसत आहे.
पुणे शहरात १० लाखाच्या आसपास चारचाकी व ४० ते ५० लाखाच्या आसपास दोनचाकी वाहने असून आजरोजी पर्यंत ९७ हजाराच्या आसपास नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली असून यापैकी फक्त २० हजार नागरिकांना नंबर प्लेट बसविण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे ३१ मार्च पूर्वी सर्व वाहनांना नंबर प्लेट बसविणे शक्य नाही.
मागची १०० वर्ष या पुणे शहर,देशात, राज्यात लाखो कुटुंब या नंबर प्लेटच्या व्यवसायावर अवलंबून आहेत ज्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो जे शासनाच्या निम्म्या किंमती मध्ये नंबर प्लेट तयार करून देतात असे असताना ही सक्ती कशासाठी? या लाखोघरांच्या घरावर बुलडोझर फिरवून ज्या पद्धतीने बाहेरच्या खाजगी कंपन्यांना काम देऊन त्यांची तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे, हे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आहे. त्याच्यामुळे या HSRP नंबर प्लेटची सक्ती रद्द करण्यात यावी,हा आमचा निर्णय केंद्र सरकार व राज्य सरकारपर्यंत पोहोचवावा,याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनास माझ्यासह, शेखर धावडे, उदय महाले, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, हेमंत बधे, गौरव जाधव, रोहन पायगुडे, जावेद शेख, फईम शेख, नरेश पगडालू, पूजा काटकर, पायल चव्हाण, विमल झुंबरे, स्वाती पोकळे, किशोर कांबळे, राजेश पवार, नागेश शिंदे तसेच पुणे शहरातील रेडियम व्यवसायिक व पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.