पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. पुणे जलमय होताच रस्त्यावर अनोखं आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी येथे होडी आंदोलन केलंय. महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ पुण्यातील मांजरी येथे होडी आंदोलन करण्यात आलंय. या अनोख्या आंदोलनाने प्रशासन गडबडून गेलंय. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरी येथील रस्त्यावर पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने (कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीज पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुणे शहरातील अनेक मार्गावर पाणीच पाणी पाहायला मिळालं. काही भागांमध्ये पावसाच्या वाहत्या पाण्यात दुचाकी गाड्या देखील वाहून गेल्याचं दिसून आलं. रस्त्याच्या कडेला, दुकानाच्या बाहेर लावलेल्या गाड्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मान्सनपूर्व पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली.
पावसामुळे कात्रज परिसरात झालेल्या दुकानांमध्ये पाणी गेलं आहे, रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते. तर, हिंजवडी भागात सुद्धा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचलं होतं. बाणेरमधील बीटवाईज चौकामध्ये अनेक वाहनं पावसाच्या पाण्यात अडकली होती.
राज्यभरात आजपासून 24 मे पर्यंत अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मेघगर्जनेसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील चार दिवस मुंबई आणि कोकणासह राज्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचं देखील सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.