मुंबई / पुणे – (रोखठोक महाराष्ट्र मंत्रालय प्रतिनिधी)
कोंढवा येथील कत्तलखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. कत्तलखान्यातील सांडपाणी, दुर्गंधी आणि आरोग्यधोका यावरून झालेल्या जोरदार चर्चा आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी हे स्पष्ट केले.
योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे –
“कोंढवा कत्तलखान्यामध्ये दररोज सुमारे १५० जनावरांची कत्तल होते. या कत्तलीमुळे परिसरात भीषण दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कत्तलखान्याचे सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत मिसळत असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे का?”
असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले –
“कोंढवा कत्तलखाना परिसरातील नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहणी करण्यात आली. यामध्ये कत्तलखान्याचे सांडपाणी मानकांच्या पलीकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित कत्तलखान्याला आदेश देण्यात आले. वैयक्तिक सुनावणी घेतल्यानंतर ८ मे रोजी तो बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.”
या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास होणारा संभाव्य धोका आणि पर्यावरणावरचा परिणाम कमी होणार आहे. कोंढव्यातील हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड चर्चेत होता आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा यामागे कारणीभूत ठरले.
🎤 योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,
“कोंढव्यातील कत्तलखाना हा केवळ पर्यावरणीय नाही, तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न होता. नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि सांडपाण्यामुळे मोठा त्रास होत होता. मी यावर अनेक वेळा आवाज उठवला आणि अखेर सरकारने योग्य निर्णय घेतला. मी कोंढवावासीयांच्या वतीने सरकारचे आभार मानतो.”
कोंढव्यातील प्रदूषणकारी आणि आरोग्यविरोधी कत्तलखान्यावर अखेर सरकारने कारवाई करत तो बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.