प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलिसांनी बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्या सराईत इसमावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करत त्यास एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई एम.पी.डी.ए. कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर पुणे शहरात प्रथमच करण्यात आली आहे.
स्थानबद्ध करण्यात आलेला आरोपी तात्याराव महादेव ससाणे (वय ५०, रा. माळीमळा, मारुती मंदिराशेजारी, लोणीकाळभोर) हा सराईत गुन्हेगार असून तो गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर मटका जुगार चालवत होता. पोलिसांकडून वारंवार करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्याने आपला गैरधंदा बंद केला नाही. त्याच्या या कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती तसेच अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले होते.
या पार्श्वभूमीवर लोणीकाळभोर पोलिसांनी ससाणे याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांचेकडे पाठविला. त्यांनी सदर प्रस्ताव मान्य करत आरोपीला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, तसेच महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “एम.पी.डी.ए. कायद्यातील दुरुस्तीनंतर लोणीकाळभोर पोलिसांची ही पुणे शहरातील पहिली कारवाई असून पुढेही अशा बेकायदेशीर मटका, जुगार, अंमली पदार्थ विक्री आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.”