पुणे

मोक्का गुन्हेगार टिपू पठाणला जामीन, पण काळेपडळ पोलिसांत नवा गुन्हा दाखल!

मोक्का कारवाई अंतर्गत जेलमध्ये असलेल्या टिपू उर्फ रिजवान पठाणला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली असली, तरी त्याच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कारण काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरच्या सय्यद नगर परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी वारंवार कार्यालयात बोलावून “हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्या,” अशी खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, पैसे न दिल्यास टेबलच्या ड्रॉवरमधून पिस्तूल काढून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात आरोपीचे साथीदार तनवीर शकील शेख, इरफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या शेख, सद्दाम सलीम पठाण आणि इतर ३ ते ४ जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

 

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास वेगाने सुरु आहे.
सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
आधीच गुन्ह्यांची मालिका असलेल्या टिपू पठाणविरोधात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याने त्याचा जेलमधील मुक्काम वाढणार की तो बाहेर येणार, यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.