पुण्यात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकी परिसरात घरगुती वादातून पतीनेच पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायली भिसे या 14 एप्रिल रोजी औंध रोडवरील जयंती कार्यक्रमातून मैत्रिणीसोबत परतत असताना रात्री उशिरा आरोपी राहुल कांबळे याने त्यांना रस्त्यात गाठलं.
दोघांमध्ये आधीपासून घटस्फोटाचा वाद सुरू होता. याच रागातून आरोपीने सायली यांच्यावर अचानक हल्ला केला. चाकूसारख्या धारदार हत्याराने कपाळ, गाल, खांदा आणि पाठीवर अनेक वार करण्यात आले.
या हल्ल्यात सायली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी राहुल कांबळेला अटक केली आहे. मात्र, पीडित महिलेने आरोपीवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
