पुणे

तुकाराम मुंढेंचा पतंजलीला मोठा दणका! 73 लाखांच्या औषधांचा साठा जप्त

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. आणि आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद समूहाला बसला आहे.
एफडीएने पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या तब्बल 73 लाख 25 हजार रुपयांच्या औषधांचा साठा जप्त केला आहे. या औषधांच्या जाहिरातींमध्ये कॅन्सर, डायबेटिससारख्या गंभीर आजारांवर शंभर टक्के उपचार आणि चमत्कारिक परिणामांचे दावे करण्यात आल्याचा आरोप आहे.
एफडीएच्या तपासात या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांनी केवळ तीन दिवसांत राज्यभर 53 ठिकाणी धाडी टाकून 33 जणांना अटक केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
या कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पुढे आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.