पुणे

सय्यदनगरमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट; PMC प्रशासनावर गंभीर आरोप

पुणे महानगरपालिकेच्या सर्व नियमांना पायदळी तुडवत सय्यदनगर परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे श्रीराम चौकाशेजारी, सय्यदनगर गल्ली क्रमांक ४, गरीब ख्वाजा मस्जिद शेजारी पाच मजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या बांधकामाकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारतीकडे जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. दहा फूट रुंदीचाही सुरळीत रस्ता नसताना या इमारतीचा प्लॅन मंजूर कसा झाला? महापालिकेने परवानगी दिली का? की नियमांना हरताळ फासत हे बांधकाम सुरू आहे? असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सय्यदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रस्ते अपुरे, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, ड्रेनेज सुविधा अपुरी, दळणवळणाच्या सुविधा मर्यादित — अशा परिस्थितीतही मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.
गुंठेवारीच्या नियमांना बगल देत काही बांधकाम व्यावसायिक पालिका अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध ठेवून कामे करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
यामधून लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना सामान्य नागरिक मात्र भविष्यात अडचणीत येत असल्याचे चित्र आहे.
मोठ्या सोसायट्यांमध्ये घर घेणे परवडत नसल्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक अशा इमारतींमध्ये सदनिका खरेदी करतात.
मात्र भविष्यात अशा बांधकामांवर कारवाई झाल्यास त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पाच मजली इमारतीमध्ये पार्किंगसह अनेक नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, सय्यदनगर परिसरातील अशा बेकायदा इमारतींवर रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून विशेष मालिकाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील बेकायदा बांधकामांचे व्हिडिओ आणि माहिती नागरिकांनी चॅनलकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की —
महापालिका आयुक्त या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालणार का?
बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार का?
महापालिकेचा महसूल बुडवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.