पुणे

कोल्हापूरच्या राजारामपुरीतील हृदयद्रावक घटना बारशाची तयारी सुरू… आणि घरावर कोसळलं दुःखाचं सावट!

कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एका महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच तिच्या आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे नाव अस्मिता प्रतीकसिंह काटकर असे असून, त्यांचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनासह आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, व्हिसेरा तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
लग्नाला सात वर्षांपेक्षा कमी कालावधी झाल्यामुळे या प्रकरणातील पंचनामा आणि पुढील प्रक्रिया न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.