पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात पहिली मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनोय कुमार चौबे यांनी दोन अधिकाऱ्यांसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, फौजदार राजू भास्कर आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या दारूकांडात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. तपासादरम्यान दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे उघड झाले आहे. हे रसायन शरीरात गेल्यानंतर दृष्टी जाणे, तोंडाला फेस येणे आणि काही तासांत मृत्यू होण्याची शक्यता असते.
पोलीस दलाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू असून आणखी मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विषारी दारूकांडात पहिली मोठी कारवाई! 6 पोलीस कर्मचारी निलंबित
