पुणे जिल्ह्यातील वेल्हे पोलीसांनी तब्बल २४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला शिताफीने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे.
वेल्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/२००२, भादंवि कलम ३०२ नुसार २८ नोव्हेंबर २००२ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंबेगाव खुर्द, ता. राजगड येथील बाबुराव रामभाऊ मग्गळे यांचा तंबाखू मागण्याच्या वादातून आरोपीने काठीने मारहाण करून खून केला होता.
या प्रकरणातील आरोपी हि-या उर्फ हिरामण शिवराम पवार, वय ४३, हा तब्बल २४ वर्षे फरार होता. त्याचा कोणताही ठावठिकाणा मिळत नव्हता.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक महाड तालुक्यातील वारंगी, निजामपूर छत्री आणि वाळण या डोंगराळ भागात पोहोचले. त्यांनी लाकूडतोड व्यावसायिकांचा वेश धारण करून आरोपीचा विश्वास संपादन केला. मात्र संशय आल्याने आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला पकडण्यात आले.
या कारवाईत महाड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ढेबे आणि स्थानिक पोलीस पाटील यांचीही मदत घेण्यात आली.
आरोपी मोबाईल न वापरता आणि ओळख लपवण्यासाठी नाव व वेश बदलून राहत होता. वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या नेतृत्वात पार पडली.
