छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गोळीबार आणि वाळू माफियांच्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बाभुळगाव परिसरात शेतकरी जालिंदर कुंजीर हे रात्री शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांना दिसले.
आवाज दिल्यानंतर वाळू माफियांनी त्यांच्यावर लाकडी दांडके आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि वाळू माफियांशी जोरदार राडा झाला. या दरम्यान दोन राऊंड फायरिंग झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
