महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही तातडीने दिल्लीला बोलावल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना, सेक्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
तसेच भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर व्यापक सेक्युलर आघाडी उभी करण्याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसपासून वेगळे झालेले पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंना दिल्लीहून तातडीचा निरोप!
