शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीची झोपेत असताना धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव बाळासाहेब बबन तांबे असे असून, ते घराबाहेर आईसोबत झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपीने अंधाराचा फायदा घेत कोयत्याने गळ्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तपास सुरू केला असता गावातील एका अल्पवयीन मुलावर संशय गेला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात मृत व्यक्ती आणि आरोपी यांच्यात यापूर्वी वाद झाल्याचे उघड झाले आहे. याच रागातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आरोपी सोशल मीडियावर धमकीवजा आणि आक्षेपार्ह संदेश पोस्ट करत असल्याची माहितीही समोर आली असून त्याच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शिरूर हादरलं! ‘मर्डर करून जेलमध्ये जाणार’ स्टेटसनंतर अल्पवयीन मुलाकडून खून
