पुण्यातील रामटेकडी परिसरात पोलिस आणि सराईत गुन्हेगार यांच्यात थरारक सामना पाहायला मिळाला. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला झाल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांना गोळीबार करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश रायकर आणि त्यांचे पथक एका गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी रामटेकडीतील आनंदनगर परिसरात गेले होते.
पोलिसांना पाहताच आरोपींनी दुचाकी थेट पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या करणसिंग दुधानी याने रायकर यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.
या हल्ल्यात रायकर जखमी झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडली. ही गोळी आरोपीच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला.
मात्र त्यानंतरही आरोपीने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत आत्महत्येची धमकी दिली आणि पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचाही प्रयत्न केला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
रामटेकडीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला! API रायकर यांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार, आरोपी जखमी
