मुंबई

राष्ट्रवादीला धक्का देत जयदत्त क्षीरसागरां यांनी स्वीकारले शिवबंधनउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जाते. क्षीरसागर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. बीड मधिल पक्षांतर्गत गटबाजीमुळे जयदत्त क्षीरसागर नाराज होते.

जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून, आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांच्यावर जयदत्त क्षीरसागर नाराज होते. राष्ट्रवादी पक्षात आपली घुसमट होत असल्याचे सांगत त्यांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला पाठिंबा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. बीडमधील एका कार्यक्रमात त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे ते भाजपात  भाजपात प्रवेश करतील असे कयास बांधले गेले होते मात्र गेल्या महिन्यात त्यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केल्याने ते शिवसेनेते जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी आज सकाळी जयदत्त क्षीरसागर यांच्या वरळी येथील निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याभेटीनंतर क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उद्योगमंत्री  सुभाष देसाई,मिलींद नार्वेकर यांच्यासमवेत जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा  दिला. पावसाळी अधिवेशनापूर्वी होणा-या राज्य  मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळणार असंल्याची जोरदार चर्चा आहे. आज शिवसेना भवनात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बीड मध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे.

दरम्यान क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी टीला केली आहे. क्षीरसागर यांनी शिवसेना प्रवेशासाठी आजचा मुहूर्त का निवडला असा सवाल मुंडे यांनी केला आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आहेत. या निकालात बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळणार आहे. हे मताधिक्य शिवसेना आणि भाजपने पाहिले असते तर या दोन्ही पक्षांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला नसता म्हणून क्षीरसागर यांनी शिवसेना प्रवेशासाठी आजचा मुहूर्त निवडला असावा असा टोला मुंडे यांनी लगावला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x