देशात अराजकता निर्माण करणारे राजकारण धोकादायक आहे. अशाने देशाचे तुकडे पडतील, समाजास तडे जातील. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतके निर्घृण राजकारण कधी कोणी केले नव्हते. ‘जेएनयू’तील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. मोदी–शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठ्याधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला होता. यावरू आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
चेहरे झाकलेल्या अज्ञात हल्लेखोर टोळीने ‘जेएनयू’मध्ये हिंसाचार केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचे हे चित्र आहे. चेहरे झाकून एक टोळके आत घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला. त्यात शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणे ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. २६/११ चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच चित्र दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीतच आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी सरकारी पत्रके वाटण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गृहमंत्र्यांवर ही काय वेळ आली आहे? ‘घर घर जागरुकता अभियाना’त स्वतः गृहमंत्री घरोघर पत्रके वाटत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली. या कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंनाही बसत आहे. त्यामुळे हिंदूही चिडले. या कायद्यामुळे ‘भाजप विरुद्ध बाकी सर्व’ अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजपची गोची झाली आहे व त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा ‘राडा’ त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे
देशातील विद्यापीठे राजकारणापासून दूर राहणे गरजेचे आहे. येथे केवळ विद्यार्जनाचेच काम व्हावे असे भाजपने सांगितले आहे, पण गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे व त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे? नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत, असे सांगणे हाच मुळी देशद्रोह आहे. दिल्लीतील विद्यापीठात असंतोष खदखदू लागला तेव्हा पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या. गृहमंत्री अमित शहा यांचा असा आरोप आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करून हिंसाचार भडकवला. गृहमंत्र्यांनी हा आरोप पुराव्यासह जबाबदारीने केला असेल तर त्या पुराव्याच्या आधारे दंगल भडकविणाऱयांवर कारवाई व्हायला हवी. दंगलखोरांना अटक करायला तुम्हाला कोणी रोखले आहे? जेएनयू’त चेहरा झाकून जे घुसले ते ‘अज्ञात’ हल्लेखोर नाहीत. अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले हे हास्यास्पद आहे. देशात अराजकता निर्माण करणारे हे राजकारण धोकादायक आहे.