मुंबई

मुंबईतील ताज हॉटेल उडवण्याची पाकिस्तानातून धमकी?

मुंबई -देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल उडवण्याच्या धमकीने मोठी खळबळ उडाली. संबंधित धमकीचा फोन कॉल पाकिस्तानातून आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे धमकीची घडामोड अतिशय गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी हॉटेलच्या सुरक्षेत वाढ केली.
कुलाबास्थित ताज हॉटेल उडवण्याची धमकी देणारा फोन कॉल सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर आला. पाकिस्तानच्या कराचीतून बोलत असल्याचे कॉलरने म्हटले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा त्याने केला. त्या फोन कॉलची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी हॉटेलची सुरक्षा वाढवली.
कराचीमधील पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यापाठोपाठ ताज हॉटेल उडवण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिसांबरोबरच इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबईत नोव्हेंबर 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी महाभयंकर हल्ला घडवला. 26/11 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी ताज हॉटेललाही लक्ष्य केले. त्यामुळे ताज हॉटेल उडवण्याची ताजी धमकी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे. दरम्यान, वांद्रे येथील ताज लॅंडस्‌ एंड हॉटेललाही तशाच प्रकारची धमकी देण्यात आली. त्यामुळे तेथील सुरक्षाही वाढवण्यात आली.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x