पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या अलाईन्मेटचा फोटो आणि भूसंपादनाला सुरुवात झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. मात्र या सर्व पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असल्याचे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) जाहिरातीद्वारे स्पष्ट केले आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही महारेलच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत ४ जून रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश जैस्वाल यांनी सादरीकरण केले होते. या बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव, खासदार डॉ. कोल्हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी हा रेल्वे प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत करायचा आहे हे स्पष्ट करुन कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॅबिनेट नोट सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर हा रेल्वेमार्ग जाणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील संबंधित आमदारांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री हा प्रकल्प मार्गी लावणार आहेत. तसेच राज्य शासनाचा २० टक्के हिस्सा देण्याचेही मान्य केले आहे.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रक्रियांमध्ये असताना चुकीच्या अथवा अपुऱ्या माहितीच्या आधारे काही लोकं दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल करीत आहेत ही असे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.