मुंबई : – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशात राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचे आयोजन केलं आहे. काही मंत्री ऑनलाइन तर काही मंत्री वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार, सर्व महत्त्वाच्या विषयांवर आणि सर्व खात्यांशी संबंधित प्रत्येक मंत्र्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. त्यामुळे यात कोरोना संबंधित आणि लॉकडाऊन संदर्भात काय चर्चे होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला व महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या त्या भागातील परिस्थिती बघून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सांगितले.