पुणे

‘कोरोना’पासून बचावाच्या कार्यात उद्योग क्षेत्रातूनही मदत – मोहन जोशी

पुणे – कोरोना संसर्गजन्य रोगापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, तसेच त्यांचे सहकारी यांना उद्योग क्षेत्रातूनही मदत करण्यात येत आहे ही बाब स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

जर्मनस्थित शमॅलझ कंपनीच्या पुणे कार्यालयाच्या वतीने ससून रुग्णालयासाठी एक हजार फेस शिल्ड मोहन जोशी यांच्या हस्ते ससूनचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी एस.चोक्कलिंगम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप जे. मणी, श्रीमती प्रिया मणी, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे सनशाईन लायन्स क्लबच्या अंजू गुरुदत्त आणि चेतन आगरवाल उपस्थित होते.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय अशा वेळी कर्तव्यभावनेने कोरोनापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलचा स्टाफ, पोलीस यांना सहाय्य करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे या भावनेने कंपनीने मे महिन्यात भोसरी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वाटले होते यावेळी ससून रुग्णालयाला आम्ही ते देत आहोत असे मणी यांनी सांगितले.

जर्मनीमध्ये तयार केलेले हे फेस शिल्ड डॉक्टर्स, पोलीस यांच्यासाठी अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त आहेत असे सांगून जोशी यांनी शमॅलझ कंपनीचे आभार मानले. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे त्यामुळे वैद्यकीय सेवेची जबाबदारी वाढलेली आहे. उद्योग क्षेत्रातून पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला विविध स्वरुपात मदत केली जाते. असेच सहकार्य यापुढील काळातही मिळत राहील असा विश्वास जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

संकटकाळात मदतकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता, आपल्या आरोग्याची काळजी घेत गरजू लोकांची सेवा करावी असे आवाहन मोहन जोशी यांनी केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x