पुणे

टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांसह सामान्य मेटाकुटीला : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन

 

पुणे : पुणे शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात येऊ नये. टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांसह सामान्य मेटाकुटीला आले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत पुणे शहर व्यापारी महासंघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

पुणे व्यापारी महासंघाचे तीस हजार व्यापारी सभासद आहेत. प्रशासनाकडून टाळेबंदी लागू न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करू नये, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील व्यापार, दुकाने गेल्या १२० दिवसांपासून बंद आहेत. दुकाने बंद ठेवणे हा करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्याचा एकमेव मार्ग नाही. व्यापाऱ्यांसह कामगार वर्ग तसेच सामान्य आर्थिक संकटात आहेत. वीज बिल, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, घरखर्चाची रक्कम दरमहा भरावी लागत आहे. शहरात करोनाचा संसर्ग वाढण्यास नेमके कोणते कारण आहे, हे अद्याप निश्चित झाले नाही. व्यापाऱ्यांची सहनशीलतेची मर्यादा संपलेली आहे. या पुढील काळात टाळेबंदी लागू झाल्यास व्यापारी बांधव आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सामाजिक अंतर न पाळणे, गर्दी करणे, मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाई जरूर करावी. नियमांचे पालन न केल्यास सर्वावर कारवाई करावी. मात्र, केवळ व्यापार, बंद ठेवून संसर्ग रोखता येणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारने व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यापारी महासंघाकडून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांकडून पर्याय; नियम न पाळल्यास कारवाईची मागणी

दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी. शनिवारी आणि रविवारी शहरात पूर्णपणे निर्बंध लागू करावेत.   जे दुकानदार नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर  दुकाने किमान तीन दिवस बंद ठेवण्याची कारवाई करावी. बेजबाबदार नागरिक, वाहनचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.  सम-विषम दिनांकाचा नियम रद्द करण्यात यावा, असे पर्याय व्यापारी महासंघाने प्रशासनाला सादर केले आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x