पुणे

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीवर गोळीबार : व्यक्ती गंभीर जखमी, हल्लेखोर पसार

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन जवळ येऊन दोन अज्ञात व्यक्तींनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना वडगाव मावळ परिसरात आज सकाळी घडली. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी या व्यक्तीच्या पोटात चार गोळ्या झाडल्या त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मिलींद मधुकर मनेरीकर (वय ५०, रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटात उजव्या बाजूला तीन तर एक गोळी मानेला चाटून गेली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुचाकीवरून आलेले दोन्ही आरोपी हे फरार झाले आहेत.

मनेरीकर हे आपले मित्र चेतन निमकर (वय ५१, रा. तळेगाव दाभाडे) यांच्यासोबत कारमधून तळेगावकडून गावाकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबवली आणि त्यांना हांडे पोल्ट्री फार्म कुठे आहे? अशी विचारणा केली. तेव्हा कारची काच खाली घेऊन मिलींद हे पत्ता विचारणाऱ्यांशी बोलत असताना दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गावठी कट्ट्याने कार चालक मिलींद मनेरीकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला लागल्या तर एक मानेला चाटून गेली.

दरम्यान, गोळीबार करीत दुचाकीवरील हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, मनेरीकर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास वडगाव मावळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x